राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाने पटकावले जेतेपद
तब्बल 11 वर्षांनी महाराष्ट्राने ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले आहे. हैदराबादमधील गच्चीबाऊल येथील जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने गतविजेत्या सेनादलाचे आव्हान 34-29 असे परतवून लावून तब्बल 11 वर्षांनी विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात महाराष्ट्राने मध्यंतराला १७-१२ अशी आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या सत्रात सेनादलाने महाराष्ट्राला चांगलीच टक्कर दिली. मोनू गोयल याने एकट्याने आक्रमण करून महाराष्ट्राला दबावाखाली आणले. नितीन तोमरला यात एकही गुण मिळवता आला नाही.
अंतिम काही मिनिटांमध्ये मैदानात आलेल्या तुषार पाटीलने तिन्हीवेळा तिसऱ्या चढाईत प्रत्येकी एक गुण मिळवत महाराष्ट्राच्या जेतेपदामध्ये निर्णायक योगदान दिले. कर्णधार रिशांक देवाडिगा व गिरिश एर्नाक यांनीही तुफानी आक्रमण करताना सेनादलाची हवा काढली. उपांत्य फेरीत कर्नाटक आणि अंतिम फेरीत सेनादलावर माज करताना रिशांकच महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या दोन्ही सामन्यात त्याला गिरीश इरनाक, विराज लांडगे, नितीन मदने यांची साथ मिळाली.