रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरुन हटवले
शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातील नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसते. रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरुन हटवले आहे. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडील नांदेडचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात अाले असून ही जबाबदारी कदम यांच्याकडे साेपवण्यात अाली.
राज्य शासनाने तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे. यात औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. रामदास कदम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदावरुन का हटविले, याची मात्र जोरदार चर्चा आहे. शिवसेनेच्या निर्णयानंतरच कदम यांना पालकमंत्रिपदावरुन दूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शासनाच्या या निर्णयानुसार औरंगाबादचे पालकंमत्रीपद रामदास कदम यांच्याकडून काढून आता ते डॉ. दीपक सावंत यांना देण्यात आले असून गुलाबराव पाटील यांची परभणीच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबादच्या नामांतरावरून खासदार चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता. या वादावरुन त्यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात आल्याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आहे. तसेच भाजपवरही कदम यांनी जोरदार टीका केली होती. ही नाराजी त्यांना नडल्याचे बोलले जात आहे.