मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका – प्रकाश आंबेडकर
संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याच जिवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (१० जानेवारी) पत्रकार परिषदेत केला. हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवरले नाही, तर त्यांचे दहशतवाद्यांमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले. भिडे गुरुजींच्या एका समर्थकाने १ जानेवारीच्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, गिरीश बापट आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्या हत्येला प्रोत्साहन देणारे पोस्ट केले होते. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर संताप व्यक्त करताना रावसाहेब पाटील या युवकाने फेसबुकवर देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट व सुधींद्र कुलकर्णी यांच्याबाबत ही आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सुरू असलेले ‘कोम्बिंग ऑपरेशन’ थांबविण्याची मागणी करतानाच आंबेडकर यांनी भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा निशाणा साधला. मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजींच्या संघटनांवर कोणाचे बंधन नाही. आपला हेतू साध्य झाला नाही, तर या संघटनांचे कार्यकर्ते थेट हत्येची भाषा करतात. त्यामुळे अशा संघटना प्रोत्साहन न देता वेळीच त्यांना आवर घालण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.