मुंबईत मुलुंडमध्ये घुसलेला बिबट्या जेरबंद
मुंबईतील मुलुंड भागात शनिवारी (१३ जानेवारी) सकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. हा भाग अगदी गजबजलेला असल्याने येथील रहिवासी सकाळपासून बिबट्याच्या दहशतीत वावरत होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. बिबट्याने सहा जणांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेलाईन ओलांडून बिबट्या या भागात घुसला असल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलुंड पूर्वेच्या नाणेपाडा या भागात बिबट्या शिरला होता. काही तास उलटल्यानंतरही बिबट्याला जेरबंद करता आले नाही. अखेर, बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला पकडण्यात आले.
बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. बालाजी कामिटे (४० वर्ष), कृष्णम्मा पल्ले (४० वर्ष), सविता कुटे (३० वर्ष) आणि गणेश पुजारी (४५ वर्ष) अशी यातील चार जखमींची नावे आहेत. नाणेपाडा भागातीलच एका इमारतीत बिबट्या लपला होता. वन विभागाचे कर्मचारी तीन तास बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करत होते. अखेर साडेअकरा नंतर बिबट्या त्यांच्या तावडीत सापडला.
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही ट्वीट करुन बिबट्या शिरल्याची माहिती दिली होती. तसेच ट्वीटरवर जखमींचे फोटो शेअर केले होते.