मिलिंद एकबोटेंना अखेर अटक, भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवल्याचा आरोप

0

भीमा-कोरेगाव दंगल भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली आहे. आजच सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी एकबोटेंना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (१३ मार्च) भीमा-कोरेगाव हिंसाचाराबाबत निवेदन दिले होते.

याआधी हायकोर्टानेही एकबोटे यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता होती. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले होते. या अहवालानुसार सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली असा त्यांच्यावर आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन्ही शहरांत गुन्हे दाखल केले आहेत. भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेवेळी आपण तिथे नसल्याचा दावा एकबोटे यांनी केले होता, तसेच या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने २२ जानेवारी रोजी फेटाळला होता. त्यामुळे मिलिंद एकबोटे अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टाची पायरी चढले होते.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.