माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न, प्रवीण तोगडिया यांचा गंभीर आरोप

0

अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेल्या विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी (१६ जानेवारी) सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. मोदी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून माझा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप तोगडियांनी केला. ‘जयपूरला विमान पकडण्यासाठी निघालो होतो, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाटेतच बेशुद्ध पडलो, पुढचे काही आठवत नाही’, असेही तोगडियांनी सांगितले.

‘काल एक अज्ञात व्यक्ति माझ्या घरात घुसला व माझ एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र असल्याचे मला सांगितले. 10 वर्षांपूर्वीची जुनी प्रकरणे उकरुन काढून मला त्यात गोवण्याचा डाव आहे. आयबीच्या माध्यमातून मला धमकावण्याचा प्रयत्न होतोय’ , असे गंभीर आरोप प्रवीण तोगाडिया यांनी केले आहेत.

तोगाडियांनी कुठल्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मागच्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी हिंदू एकतेसाठी प्रयत्न करत आहे आणि करत राहील. मी अशा षडयंत्राला मुळीच घाबरत नाही, असे प्रवीण तोगाडिया म्हणाले. या पत्रकार परिषदेदरम्यान तोगाडिया यांना रडू कोसळले. मला राजस्थान पोलीस अटक करायला आल्याचे सांगण्यात आले पण राजस्थानच्या गृहमंत्र्यांशी मी बोललो त्यावेळी त्यांनी माझ्या नावे कुठलेही अटक वॉरंट नसल्याचे सांगितले. मी लगेच माझा फोन स्विचऑफ केला. पोलीस, सीबीआय यासारख्या संस्थांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असे आवाहन त्यांनी केले. राम मंदिर, गोहत्या, काश्मिरी हिंदूंचं विस्थापन, शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किंमत यासारख्या मुद्द्याबाबत लढत आहे आणि लढत राहील.

डॉक्टर असलेले प्रवीण तोगाडिया यांनी 1984 पासून विश्व हिंदू परिषदेत कामाला सुरुवात केली. प्रवीण तोगाडिया सोमवारी (१५ जानेवारी) बेपत्ता झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर रात्री ते शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडले. अहमदाबादमधील चंद्रमणी रुग्णालयात प्रवीण तोगडिया यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सोमवारी (१५ जानेवारी) सकाळपासून प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी चार पथके कामाला लावली होती. सोमवारी संध्याकाळपर्यंत तोगडिया यांचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. मात्र, रात्रीच्या सुमारास ते अहमदाबादमधील शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजस्थान पोलीस प्रवीण तोगडिया यांना पकडून घेऊन गेले, असे विहिंपने म्हटले होते. मात्र सहपोलीस आयुक्त जे. के. भट्ट यांनी ही माहिती नाकारली होती. आम्ही किंवा राजस्थान पोलिसांनी तोगडिया यांना पकडलेले नाही. ते ‘बेपत्ता’ आहेत व त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके स्थापन केली आहेत, असे त्यांनी सांगितले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.