पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा

0

वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 600 रु. दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अचलपूर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

मागच्या वर्षी चांदूर बाजारत वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आज (17 जानेवारी) शिक्षा सुनावली आहे. आमदार बच्चू कडू यांना 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून 600 रुपये दंडही भरावा लागणार आहे.

काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी 24 मार्च रोजी आमदार बच्चू कडू हे परतवाडा एस टी डेपो चौकातून जात होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना तिथे अनेक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असल्याच्या दिसल्या. त्यावेळी त्या परिसरातील वाहतूक पोलिस इंद्रजीत चौधरी यांना बसेसवर कारवाई का करत नाही, असा जाब आमदार कडू यांनी विचारला. त्यावेळी आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी मारहाणीचा आरोप फेटाळला होता. पोलिसांनी व्यवस्थित वाहतूक नियंत्रित न केल्याने त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. त्याबाबतचा जाब लोकप्रतिनिधी म्हणून विचारला होता. मात्र पोलिसांनी उद्धट उत्तरे दिली, त्यावेळी त्याच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता, मात्र मारहाण झाली नव्हती, असा दावा बच्चू कडू यांनी केला होता.

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अचलपूरमधून अपक्ष आमदार आहेत. प्रहार युवा संघटनेचे ते संस्थापक अध्यक्षही आहेत. युवकांचे संघटन करुन विविध विषयांवर आंदोलने करत असतात. आपल्या साध्या राहणीमान आणि हटके आंदोलनांमुळे बच्चू कडू नेहमीच चर्चेत असतात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.