‘पद्मावत’ला अखेर मुहूर्त, सेन्सॉर बोर्डाने दिला हिरवा कंदील
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘पद्मावत’ चित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला असून 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित व निर्मित या चित्रपटाचे आधीचे नाव ‘पद्मावती’ होते. या चित्रपटाला करणी सेना संघटननेसह काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे नाव बदलण्याची सूचना केली होती.
चित्रपटातील ‘घुमर’ गाण्यामध्येही बदल करण्याचा; तसेच चित्रपट दाखवण्यापूर्वी सतीच्या प्रथेला पाठिंबा नसल्याबाबतचे सूचनापत्र दाखवण्यात यावे, अशा सूचना या सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. त्यानंतर भन्साळी यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी दर्शवली होती. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले असून तो 25 जानेवारीला प्रदर्शित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तसेच, अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ आणि मनोज वाजपेयी आणि सिद्धार्ध मल्होत्राचा ‘अय्यारी’ चित्रपटदेखील 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. २५ तारखेनंतर सतत तीन दिवस सुट्या येणार असल्याने २५ला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाना याचा फायदा होणार आहे. परंतु दिग्दर्शक नीरज पांडेने सांगितले, कि त्याच्या ‘अय्यारी’ चित्रपटाची रिलीज डेट बदलू शकते. कारण त्याला त्याचा चित्रपट मोठ्या चित्रपटासोबत प्रदर्शित करायचा नाहीये.