निवडणुकांचा वेध, निशाना ‘मध्य’वर!

मोफत पाणी वाटपानंतर 10 रुपयात आणणार 'जेवणाचे ताट'

0

अभय निकाळजे ( वरिष्ठ पत्रकार ) :-

निवडणुकांना आता सर्वसाधारणपणे दीड वर्षाच्या कालावधी राहिलेला आहे. आत्तापासून काहीजण कामाला लागले आहेत. एकाने गेल्या विधानसभेपुर्वी मोफत पाणी वाटप सुरू केले होते. आता तर 10 रूपयांमध्ये ‘जेवण’ देण्याची योजना आणण्याच्या तयारीत हा नेता आहे.

या नेत्याने ऐन विधानसभेपुर्वी सेनेला सोडचिठ्ठी देत कमळबाईच्या कळपात सामिल झाले होते. त्यांना म्हणे औरंगाबाद मध्य (मद्य) विधानसभेतुन उमेदवारी हवी होती. ती मिळविण्यासाठी आणि आपला मतदार (ग्राहक) फिक्स करण्यासाठी हा मोफत पाण्याचा ‘फंडा’ काढला होता. हा लयभारी फंडा होता. पाणी फुकट आणि त्यावरचा ‘आरओ’ प्लांट कवडीमोल भावात (मेड इन युएई(उल्हासनगर)) आणलेला. म्हणजे जागा महानगर पालिकेच्या मालकीची त्यावर एखादी संस्था ‘बीओटी’ वर इमारत बांधणार ती किंमतीपेक्षा जास्त दिवस ती संस्था वापरून घेणार. इमारत अगदी मोडकळीस येईपर्यंत ती बांधणारी संस्था पैसे कमावणार, ती इमारत वापरण्याच्या लायकीची रहात नाही तोपर्यंत हा बीओटी चालणार.

महानगर पालिकेला एक मालमत्ता विना खर्च उभी राहील्याचे समाधान तर नगरसेवकांना आणि अधिकाऱ्यांना फार श्रम न करता ‘कमाई’ झाल्याचे समाधान. तसे या मोफत पाण्याच्या बाबतीतही झाले. पाणी घेणाऱ्यांना घरात ‘वाॅटर प्युरीफायर’ न बसविता फुकट पाणी मिळाल्याचे समाधान, पाण्याच्या वाहतुकीच्या नावाखाली नेत्याची झालेली ‘कमाई’ वेगळीच. चार वर्षात त्या आरओ प्लांटची किंमतही वसुल झाली अन् नेत्याला 2019 च्या निवडणुकीच्या फंडची व्यवस्थाही झाली. हा धंदा चांगला सेट झाल्याने त्याने ‘बालेकिल्ल्यात’ सेनेला महापालिका निवडणुकीत मात देऊन मोठी कामगिरी केली.

* 10 रुपयात जेवणाचा फंडा
हा फंडा तर अधिक सोईचा कारण त्यांनी 15 वर्षांपासुन ‘घाटी’ मोफत खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे. तो नित्य नियमाने सुरू आहे. त्याची ‘इकोनॉमी’ त्यांना कळलेली आहे, म्हणुन त्यांनी आता हा 10 रूपयात जेवणाचा घाट घातला आहे. त्यासाठी पोळ्या तयार करणाऱ्या ‘मशिन’ची ऑर्डरही दिली आहे. धान्य मिळावे म्हणून आधीच शासन मान्य शाळा नेत्यांकडे आहे. त्यामुळे तांदूळाचा पर्यायाने खिचडीचा मुद्दा संपतो.

रेशनचा चांगल्या प्रतीच्या गव्हाची पोळी 10 रुपयांच्या जेवणात मिळेल नाही तर सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याचा काय तो फायदा? स्थानिक कार्यकर्त्यांनी गुलमंडीवर कितीही पोस्टर लावली तरी प्रदेशाध्यक्षाशी ‘सुत’ जुळवुन ठेवल्याचा फायदा नेत्याला नक्की आहे. नेत्याची तयारी थेट सबसे बडे बाबा खैरे बाबांना चॅलेंज करण्याची आहे. बघू या 10 रुपयांच्या अन्नदानातून ‘ते’ दान मिळते का ते? सर्व काही फक्त सत्तेसाठी.!

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.