धर्मा पाटील यांना व्याजासह मोबदला देऊ – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यु झाला. यांच्या मृत्यूमुळे सरकारचे धाबे चांगलेच दणाणले आहे. २२ जानेवारीला त्यांनी विष प्रशान केले होते. त्यांच्यावर मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मृत्यूनंतर सरकार आता त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हालचाली करत आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावषयी माहिती दिली.
एका आठवड्यात जमिनीचे फेरमुल्यांकन केले जाईल. त्यानंतर धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्क्म व्याजासह देणार असल्याचे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जमीन संपादनाच्या बाबतीत चूक झाली असेल तर त्यांना व्याजासह मोबदला देऊ. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसात येईल. २००९ ते २०१५ पर्यंत या काळात जो अन्याय झाला, तो आता होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना जमिनिचे फेरमूल्यांकन करण्याचे लेखी आदेश दिले असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विष प्राशन केल्यानंतर पाटील यांच्यावर मुंबईच्या जेजे रुग्णालायात उपचार सुरु होते. रविवारी (२८ जानेवारी) रात्री त्यांची प्राणज्योत मालावली. धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात वारंवार येऊन तक्रार दिली. मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. त्यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही आणि त्यांना शहीद भूमिपुत्र शेतकरी असा दर्जा देण्याचे आश्वासन सरकार देणार नाही, तोपर्यंत आपल्या वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही असे त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन औष्णिक प्रकल्पासाठी संपादित केली होती. मोबदल्यात आजपर्यंत चार लाख रुपये मिळाले. नुकसान भरपाईसाठी ते गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरठे झिजवत होते.