दहा रुपयांच्या नव्या नोटा लवकरच येणार चलनात
दहा रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात आणल्या जातील, अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकने केली आहे. या नव्या नोटा राष्ट्रपिता महात्मा गांधी सीरीजच्या असणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून दहा रुपयांच्या 100 कोटी नोटांची छपाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या जातील. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांची नोट आरबीआयने व्यवहारात आणली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोनशे, पन्नास रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आता दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या जात आहेत.
दहा रुपयांच्या नव्या नोटांचे वैशिष्ट –
दहा रुपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी सीरीजच्या असतील. या सर्व नोटा ब्राऊन कलरच्या असतील. या सर्व नोटांवर कोणार्क सूर्य मंदिरचे चित्र असणार आहे. नव्या नोटांच्या नंबर पॅनेलच्या इन्सेटमध्ये इंग्रजीमध्ये ‘एल’ अक्षर चौकटीत लिहिण्यात आले आहे. नोटांच्या मागील बाजूस छपाई वर्ष 2017 लिहिलेले असेल. त्यावर रिझर्व्ह बँकेच्या नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे हस्ताक्षर असणार आहे. सध्या चलनात असलेल्या दहाच्या नोटा कायम राहणार आहेत.