डहाणूमध्ये 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली
समुद्रात बोट उलटल्याची घटना पालघरमधील डहाणू येथे घडली आहे. यात 40 विद्यार्थी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 32 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सोनल भगवान सुरती आणि जान्हवी हरिश सुरती या दोन 17 वर्षीय विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून दोघीही डहाणूतील आंबेडकरनगरमधील रहिवाशी होत्या. सहाजण अद्याप बेपत्ता आहेत. बोटीमध्ये के.एल.पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी होते. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून बचावकार्य सुरु केले आहे. सर्व विद्यार्थी अकरावी-बारावीचे विद्यार्थी आहेत. बोट उलटण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल गेली होती. 40 विद्यार्थ्यांना घेऊन डहाणूच्या समुद्रात एक बोट गेली. मात्र, अचानक बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. समुद्र किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली.