जालन्यात तरुणाची हत्या करून रस्त्यावर मृतदेह जाळला
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड-पाथरवाला रस्त्यावर एका तरुणाची हत्या करुन भर रस्त्यावर त्याचा मृतदेह अर्धवट जाळल्याची घटना घडली आहे. अनंत इंगोले (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंबड रोडवर कुरण फाटा इथे रविवारी (७ जानेवारी) रात्री एक ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आज (८ जानेवारी) पहाटे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
मृतदेहाजवळ मिळालेल्या आधार कार्डमुळे तरुणाची ओळख पटली आहे. अनंत इंगोले हा मृत तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. अज्ञातांनी अनंत इंगोलेची हत्या करुन त्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध टाकून तो रॉकेलने जाळला. त्याच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.