घटना दुरुस्तीमुळे राष्ट्रनिर्माणात महिलांना समान संधी – विजया रहाटकर

0

औरंगाबाद, (दि.22)

प्राचीन काळापासून पंचायत राज व्यवस्था देशात आहे. कालांतराने त्यात बदल होत गेले घटना दुरुस्तीमुळे महिलांना भरभरुन संधी देण्यात आली. त्यात विशेषत्वाने पुरुषांच्या बरोबरीचे समान स्थान महिलांना या घटना दुरुस्तीतून मिळाल्याने देशाची विकासाची व्दारे खुली झाली, असे प्रतिपादन राज्य महिला आयेागाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले.

मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या 25 वर्षपुर्ती निमित्त ‘प्रगती आणि भावी वाटचाल’ यावर आयोजित विभागीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी.ए. चोपडे, मनपा आयुक्त डॉ. एम. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी मधुकरराजे अर्दड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवन गोरे, राज्य निवडणूक आयोगाचे मृदुल निळे, अवर सचिव रीना फणसेकर, कृषी परिषदेचे सेवानिवृत्त संचालक के.एम. नागरगोजे आदींची उपस्थिती होती.

विजया रहाटकर म्हणाल्या, ‘देशात 600 जिल्हा परिषद, 6000 पंचायत समिती, 2 लाख 30 हजार ग्रामपंचायती आणि 28 लाख लोकप्रतिनिधी आहेत. त्यात 14 लाख लोकप्रतिनिधी महिला आहेत. जगात सर्वाधिक महिला प्रतिनिधी भारतात आहेत. ही अभिमानाची बाब असल्याचे विजया रहाटकर म्हणाल्या. घटना दुरुस्तीच्या 25 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात राजकारणासह विविध क्षेत्रात मोलाचा ठसा उमटविला. अष्टांगवधान असल्याने महिलांनी आज विकासकामात आग्रह धरुन विकासाचा ध्यास घेतलेला आहे. घटना दुरुस्तीमुळे देशात आमुलाग्र परिवर्तन झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीला सर्वांनी बळ देणे महत्त्वाचे आहे. सुशासनासाठी एकत्रित निवडणूकांचा विचार, पंचायत राज संस्थेला संपूर्ण स्वायत्तत्ता, लोकप्रतिनिधींना उत्तम प्रशिक्षणातून लोकांना अपेक्षित सुशासन निर्माण करता येईल, अशाही विजया रहाटकर यांनी यावेळी सूचना केल्या.

राज्य महिला आयोगामार्फत महिलांच्या विकासासाठी आवश्यक त्या सूचना पोहचविण्याचे काम करण्यात येते. राज्यात 45 संशोधन प्रकल्प, 250 कार्यशाळांतून महिला सक्षमीकरणासाठी काम होते आहे. महिलांच्या विकासासाठी आयोगाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीसुद्धा विजया रहाटकर यांनी यावेळी दिली.

विभागीय आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, ‘मराठवाड्यातली दुसरी परिषद औरंगाबादेत होते आहे. देशात जात, पंथ, भाषा यांच्यात वैविध्यता असतानाही केवळ भारतीय संविधानामुळे देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. पंचायत राज बळकटीकरणासाठी अधिकारी, पदाधिकारी यांनी घटना दुरुस्तीचा आदर करुन समन्वयातून काम करणे अपेक्षित आहे. मराठवाड्यात उत्तमप्रकारचे कामे झाली आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मूर्तस्वरुप आल्याचे मराठवाड्यातील विकासकामांतून दिसून येते आहे. मागील वर्षभरात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयातून ग्रामीण भागात 11 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत ग्रामसभेत पाण्याचे नियोजन, मनरेगाच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळे, घरकुल, विहिरींची कामे होऊन कायापालट होतो आहे. या सर्व विकासाचे गमक म्हणजे घटना दुरुस्ती असल्याचेही भापकर यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनीही गुणवत्ता महत्त्वाचे असल्याचे सांगत लोकप्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासाबाबत माहिती देऊन ही पद्धत मूळ प्राचीन भारतातून आल्याचे सांगितले. कुलगुरु डॉ. चोपडे यांनीही घटना दुरुस्तीची गरज, यश याबाबत मार्गदर्शन केले. विद्यापीठ, प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासकांनीही घटना दुरुस्तीवर संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन केले.

सुरुवातीला कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, निवडणूक, महापालिका असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिकॉर्ल, स्वच्छ भारत मिशन, महिला व बालकल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रदर्शनी दालनांचे विजया रहाटकर यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. परिषदेचे दीपप्रज्वलन करुन सुरुवात झाली. परिषदेत घटनादुरुस्तीच्या शोधप्रबंध पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. महापौर घोडेले, मृदुल निळे, मधुकरराजे अर्दड, डी. एम. मुगळीकर यांनीही घटना दुरुस्तीबाबत विचार मांडले. तसेच परिषदेला शुभेच्छा दिल्या. कार्यकमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. वर्षा ठाकुर यांनी केले.

– घटना दुरुस्तीमुळेच मी महापौर
घटना दुरुस्तीमुळेच महापौर पदाची माळ गळ्यात पडल्याची कबुली विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांनीही वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली असताना देखील घटना दुरुस्ती मुळे राजकारणाची दरवाजे महिलांना खुली झाल्याने, समान संधी मिळाल्याने औरंगाबादची महापौर होऊ शकल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.