कौमार्य चाचणी प्रथेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या तरुणांना मारहाण, गुन्हा दाखल

0

कंजारभाट समाजातील नववधूची ‘कौमार्य चाचणी’ या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या तरुणांना समाजातीलच इतर तरुणांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही कायम आहे. या प्रथेविरोधात समाजातीलच काही तरुणांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवाज उठवला. यासाठी तरुणांनी ‘# Stop The “V”Ritual’ या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे.

पिंपरी चिंचवड येथील प्रशांत इंद्रेकरसह त्याच्या काही मित्रांनी या प्रथेविरोधात आवाज उठवला आहे. ही प्रथा बंद व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही देखील पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचा हा विरोध त्यांच्याच समाजातील इतर तरुणांना पटला नाही. म्हणून त्या तरुणांनी प्रशांत इंद्रेकरसह त्यांच्या साथीदारांना मारहाण केली.

आरोपी सनी मलकेच्या बहिणीचा विवाह होता. सनी मलकेने तक्रारदार प्रशांत इंद्रेकरसह त्याच्या मित्राला लग्नाचे आमंत्रण दिले होते. 21 जानेवारीला रात्री हा विवाह पार पडला. यानंतर प्रथेनुसार जातपंचायत भरली. जात पंचायत संपल्यानंतर प्रशांत मंडपात गेला तेव्हा सनी मलके आणि त्याचे मित्र प्रशांतच्या मित्राला मारहाण करत असल्याचे प्रशांतला दिसले. सनी मलके आणि त्याच्या साथीदारांनी प्रशांतलाही मारहाण केली. समाजाच्या रूढी परंपरांना विरोध का करता, असा सवाल करत मारहाण केली.

प्रशांत इंद्रेकर या तरुणाच्या तक्रारीनंतर 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सनी मलके (वय 25), विनायक मलके, (वय 22) अमोल भाट, (वय 20), रोहित रावळकर, (वय 21), मेहूल तामचीकर (वय 23) या तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.