कोरोना बळी : जीव गमावलेल्या पत्रकार राहुल डोलारेंचा मित्र परिवार आठवणींनी हळहळतोय

0
औरंगाबाद – सामनाचे ज्येष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचे आज (ता. १४) सकाळी कोरोनाने निधन झाले. त्यांच्याप्रती शहरातील पत्रकार आणि इतर मान्यवर शोकसंदेश व्यक्त करत आहेत. आठवणींना उजाळा देताना तो हळहळतोय. हसमुख, मनमिळाऊ स्वभावाच्या राहुलभाऊ यांना एआयएन न्युज तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली..
आपल्याला एकत्र करून तो गेला!
राहुल डोलारे म्हणजे आमचा डोल्या. पत्रकारितेतील त्याची सुरुवात अत्यंत संघर्षमय. ना कुणी गॉडफादर, ना कुणाची ओळख तरीही छोट्या छोट्या दैनिकात काम करीत तो इथपर्यंत पोहचला आणि आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सतत हसमुख, काय भाऊ, आज काय. मायला अवघड दिसतंय, ते त्याच्या तोंडातील सततचे शब्द. जे आज कानात घुमतायेत. असा हा आमचा राहुल्या जेव्हा पत्रकार संघटना स्थापन करण्याचा विषय निघाला तेव्हा सर्वात आघाडीवर राहिला. ना कोणती पदाची अपेक्षा ठेवली, ना दुसरा काही स्वार्थ. संघटनेच्या स्थापनेसाठी तो त्याच्या जुन्या संघटनेतील जिवलग मित्रांना भांडला. आणि अखेर त्याच्या प्रयत्नांमुळे ही संघटना अस्तित्वात आली. स्पष्टवक्तेपणा हा त्याचा गुण. अरे संघटनेची कागदपत्रे जमा करण्यासाठी एकटा अनेकांकडे तो फिरला आणि आम्हा सर्वाना एकत्र करून आज त्याने आपल्यातून कायमची एक्झिट घेतली.
ऍडमिट होण्याच्या आदल्यादिवशी संघटनेच्या पुढील कामाबद्दल अर्धा तास तो मला बोलत होता, हे करू, ते करू. मी म्हटलं हे वातावरण निवळू दे, लागू कामाला. म्हणाला हे कोरोना चालतच राहील रे… आणि तो माझा शेवटचा कॉल. त्यानंतर तो नॉटरीचेबल ते कायमचाच..
शून्यातून पत्रकारितेत आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुल्याला भावपूर्ण श्रद्धांजली
– विनोद काकडे ( पत्रकार, दै. पुढारी )
अध्यक्ष, औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघ
———————————————-

आणखी एका पत्रकाराचा बळी गेला.. औरंगाबादचे सामनाचे पत्रकार राहूल डोलारे आपणास सोडून गेले… मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांची संख्या २४ झाली.. 30-35 पत्रकार कोरोनाशी लढा देत आहेत..

डोकं सुन्न झालंय.. ज्या पध्दतीनं पत्रकारांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत.. ते सारं अस्वस्थ करणारं आहे.. यातही दु:ख असं की, जे गेलेत त्यातही बरेच जण पन्नाशीच्या आतले आहेत.. म्हणजे एेन उमेदीच्या काळात ते आपल्याला सोडून गेले.. परिस्थितीच अशी भयंकर आहे की, आपण सारेच हतबल आहोत.. आभाळ फाटलंय… ठिगळ तरी कोण आणि कोठे कोठे लावणार? सरकार काही करीत नाही आणि ज्या माध्यम समुहांसाठी आपण काम करतो ते लगेच हात वर करून मोकळे होतात.. अपेक्षा तरी कोणाकडून करायची? ज्या समाजहिताच्या गोष्टी आपण आयुष्यभर करतो तो समाज मला काय त्याचे या भूमिकेतून उपेक्षा करतो आहे.. ..शिवसेना नेते एकनाथ शिंदे किंवा रामशेठ ठाकूर याचयासारखयांचा अपवाद सोडला तर कोणीही समोर येऊन ज्यांचे संसार उघडे पडलेत त्यांना मदतीचा हात द्यायला तयार नाही.. सरकारनं पन्नास लाख रूपये देण्याची घोषणा केली.. विम्याचा घोषणा केली.. या घोषणा घोषणाच राहिल्या आहेत.. त्यामुळे माध्यमात काळजीचे आणि भितीचे ही वातावरण आहे.. एक हतबलता सर्वत्र दिसते आहे.. हे कसं थांबणार किंवा थांबवायचं या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही..

एस.एम. देशमुख, जेष्ठ पत्रकार, 

(माजी आध्यक्ष मराठा पत्रकार संघ )

………………………………………………..
आणखी एक धक्का..
करोना किती बळी घेणार आहे?
‘सामना’तला पत्रकार मित्र
राहुल डोलारे याची झुंज थांबली.
हसतमुख, उत्साही मित्र हरपला..
अस्वस्थता कुरतडायला लागलीय..
श्रद्धांजली
– महेश देशमुख (ज्येष्ठ पत्रकार, दिव्यमराठी)
…………………………………………………….

कोर्टातली कुठली तरी निकालाची ‘ऑर्डर’ होती. बातमीसाठी मी संबंधित वकिलांना फोन केला. वकील म्हणाले, माझ्या बाजूला पत्रकार राहूल डोलारे आहेत, ते तुम्हाला अधिक सांगतील, थांबा देतो त्यांना.

मी म्हणालो, काय खळबळ?
ते म्हणाले, थांब, तुला व्यवस्थित लिहून देतो. कोर्टाची बातमी आहे, काही चुकायला नको. (कोर्टाची बातमी म्हणली की, एक तर प्रमोद माने सर, कल्याण देशमुख आणि राहुल डोलारे हक्काची. आली बातमी की कर फोन) राहुल डोलारे म्हणजे मदतीला तत्पर. कधी कधी स्वतः फोन करून सांगायचा. कुठंय बे. लै मोठी बातमी आहे. ये लवकर.

शेवटचा संवाद फारफार तर पंधरवड्यापूर्वीचा. त्यानंतर आज बातमी आली, राहुल डोलारे यांचं निधन.

राहुल डोलारे, हे बहुजन पत्रकारांचा खंदा सहकारी होता. माझी आणि त्यांची मैत्री नेहमीचीच जिव्हाळ्याची. आज निघून गेल्यानंतर प्रचंड वेदना झाल्या. हे असं कोरोनाने करायला नको होतं.

माधव सावरगावे  (पत्रकार, साम टिव्ही)

—————————————
आज आणखी एक सहकारी मित्र आज आपल्यातून निघून गेला,तब्बल आठ वर्ष अनेक प्रसंगात या मित्राच सहकार्य वेळो वेळी मिळालं,दैनिक सामना वृत्तपत्राचे पत्रकार राहूल डोल्हारे आज आपल्यात नाहीत,अत्यंत दुखतं आणि मन सुन्न करणारी घटना,राहूल डोल्हारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
– लक्ष्मण सोळुंके
——————————–
 सामनाचे पत्रकार Dolhare Rahul भाऊ यांचे आज कोरोनाने निधन झाले. देवगिरी तरुण भारत मध्ये २०१० च्या दरम्यान, काही काळ त्यांच्यासोबत सहकारी म्हणून काम करता आले. कधीही भेटले तरी, नेहमी हसमुख चेहऱ्याने “काय अतुल” म्हणत बोलायला सुरवात करणारे राहुल भाऊ आता आपल्यात नाहीत. संघटनांची आंदोलने, पत्रकार परिषदा, याशिवाय गाडीवरुन जाताना कधी एकमेकाला क्रॉस झालो तर लगेच मोठ्याने नाव घेऊन आवाज देणारे आणि थांबवून बोलणारे राहुल भाऊ तुमची नेहमी आठवण येत राहील. सकाळमधील सहकारी अनिल जमधडे यांच्याशी तुमचा रोजचा संवाद व्हायचा. फोन वाजला कि, डोल्याचा फोन आला. असे अनिलभाऊ म्हणायचे. अनेकदा तो फोन मीच कधीकधी उचलायचो. आणि त्रास द्यायचो. आता असा अगाऊपणाच काय एकदा पहायची संधीही दिली नाही. पण हसणं.. बोलणं.. एवढंच काय गाडीवर बसण्याची स्टाईलही लक्षात राहील.
भावपुर्ण श्रद्धांजली!
– अतुल पाटिल (पत्रकार , दै. सकाळ )
——————————————————-
चटका लावणारी एक्झिट…
दररोज सकाळी न चुकता फोन करणारा मित्र, दिलखुलास व्यक्तिमत्व,
परप्रांतीय मजुरांचे लोंढे परतत असताना, दररोज रेल्वे स्टेशनवर जाऊन मजुरांच्या व्यथा मांडण्यासाठी सतत धडपडणारा मित्र, कोरोनाच्या काळातही स्वतःची काळजी न करता लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी सतत भिरभिर फिरणारा तू…
राहुल डोलारे तुझ्या जाण्यावर विश्वास बसत नाही
निशब्द आहोत आम्ही.
अनिल जमदाडे ( पत्रकार, दै. सकाळ )
——————————————————

काय रे भाऊ, काही आहे का…? असा शब्द आता कानावर पडणार नाही.
धक्कादायक…. खूपच वाईट बातमी.. राहुल डोल्हारे अचानक सर्वांमधून निघून गेलेत. मनमिळाऊ, हसतमुख आणि मदतीला नेहमीच तयार अशी त्यांची ओळख. रेल्वे, विमान आणि अन्य बिटाच्या माध्यमातून आम्ही नेहमी संपर्कात असायचो. एकादी बातमी हवी असल्यास हक्काने आम्ही एकमेकांना फोन करायचो. त्यांच्या फोन आला की ‘कुठेस, काय रे भाऊ, काही आहे का…?’ अशा प्रकारच्या वाक्याने त्यांची सुरुवात असायची. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ते तपासणीसाठी आले होते. इथे कसंकाय विचारणा केल्यानंतर त्यांनी रुटीन तपासणीसाठी आलोय, शस्त्रक्रिया करायचीय. डॉक्टरांची तारीख मिळाल्यानंतर शस्त्रक्रिया करू असे ते म्हणाले. त्यानंतर रुटीन प्रमाणे काही असेल तर टाकून दे असे म्हणत ते निघाले. ही भेट शेवटची ठरेल हे वाटलंच नव्हतं.

भावपूर्ण श्रद्धांजली राहुलभाऊ

तुषार वखरे ( पत्रकार ,दै.पुण्यनगरी )


 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.