‘किसान लाँग मार्च’ शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू

0

‘किसान लाँग मार्च’च्या आंदोलकांच्या १२ जणांचे शिष्टमंडळ आणि सरकार यांची बैठक विधानभवनातील सचिवालयात सुरू झाली आहे. आंदोलकांकडून आमदार जे. पी. गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांच्यासह १२ जणांचे शिष्टमंडळ आले असून सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या समितीतील ६ मंत्री व सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित आहेत.

‘विविध मागण्या घेऊन मोर्चा नाशिकमधून आला आहे. ९० ते ९५ टक्के गरीब आदिवासी या मोर्चामध्ये सहभागी आहेत. सरकार सुरुवातीपासून आंदोलकांच्या संपर्कात आहे. परंतु ते मोर्चावर ठाम होते. शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांना अडथळा न आणता मोर्चा काढल्याबद्दल त्यांचे कौतुक. वनजमिनीचा हक्काचा प्रश्न प्रमुख आहे. सरकार त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक आहे. आम्ही सत्तेत असल्याने आम्हाला समर्थन देता येत नाही, निर्णय घ्यावा लागतो याची पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या न्याय मागण्यांची दखल सरकार घेणार’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

विविध मागण्यांसाठी २०० किमीचे अंतर कापून किसान सभेचा मोर्चा आज (१२ मार्च) पहाटे पाच वाजेच्या सुमारास मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाला. सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे वाटचाल सुरु केली. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून मोर्चेकऱ्यांनी रात्रीच आझाद मैदान गाठण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आंदोलकांचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.

आज १० वी आणि १२ वीची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी व्यवस्थितपणे परीक्षेसाठी जाता यावे, म्हणून वाहतुक कोंडी होणार नाही, यासाठी आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांचे म्हणणे आंदोलकांनी मान्य करून पहाटेच आझाद मैदान गाठले.

सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पहाटे आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून आंदोलक पहाटेच आझाद मैदानाकडे निघाले, यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.

लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही. मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालू, असा निर्धार आंदोलनकांनी व्यक्त केला. यावर लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा करून तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी दिला. गिरीश महाजन यांच्याशी शेतकरी नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. अजित नवले, अशोक ढवळे, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील, जीवा गावित या बैठकीला उपस्थित होते.

आज आझाद मैदानात मोर्चेकऱ्याची भव्य सभा होणार आहे. किसान सभेचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते सभेत सहभागी होणार आहेत. आज संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सिस्ट) नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत.

शासनाकडून समिती स्थापन –

आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारकडून एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख या ६ मंत्र्यांचा या समितीत समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आंदोलकांच्या प्रतिनिधींशी आज दुपारी १२ वाजता चर्चा करेल.

किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक रविवारी (११ मार्च) रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, अशी माहिती समोर आली आहे.

काय आहेत मागण्या?

* संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न या मागण्या घेऊन आंदोलक शेतकरी मुंबापुरीत दाखल झाले आहेत.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.