कर्नाटकाचे गुणगाण गाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा – अजित पवार
बेळगावमध्ये जाऊन कन्नड प्रेमाचे गुणगाण गाणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. माहूर येथे हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार यांनी ही मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रचे समन्वय मंत्री आहेत. त्यांनी कर्नाटक गौरव गीत गाणे निषेधार्ह आहे, असे अजित पवार म्हणाले. आपल्या मंत्र्याने परराज्यात जावे, पण आपल्या राज्याचा अभिमान आणि अस्मिता पाळावी असेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.
नेमके काय आहे प्रकरण?
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावातील एका मंदिराच्या उद्घाटनाला चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाषणाची सुरुवात ‘हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू’ (जन्माला यायचे तर कर्नाटकात जन्म घ्यावा) या कन्नड गाण्याने केली. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याची ओळ म्हटल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. कन्नड गाण्याची ओळ सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांना नाराज केले आहे, असे मराठी युवा मंचचे सुरज कणबरकर यांनी मत व्यक्त केले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीही निषेध व्यक्त केला आहे. ते ट्वीट करून म्हणाले, “महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी”.