कमला मिल आग प्रकरणातील ‘वन अबव्ह’चा तिसरा मालकही अटकेत
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीतील मुख्य आरोपी व वन अबव्ह पबचे तीन मालक कृपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांना बुधवारी (१० जानेवारी) रात्री अटक करण्यात आली. कृपेश संघवी आणि जिगर संघवी या दोन भावांना वांद्र्यात अटक केली. दोघांना त्यांच्या वकिलांच्या घराबाहेरून ताब्यात घेतले. दोघे अटक टाळण्यासाठी वकिलांकडे गेले होते.
अभिजीत मानकर याला या दोघांनी दिलेल्या माहितीनंतर अटक करण्यात आली. 29 डिसेंबरला झालेल्या अग्नीकांडानंतर हे आरोपी फरार झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर एक लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.
दोघांना आपल्या घरात आश्रय देणा-या आणखी एक हॉटेल मालक विशाल कारिया याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. विशाल कारिया हा पब, रेस्टांरंटमध्ये काळा पैसा लावत असे. विशाल कारियाच्या माहितीवरूनच मुंबई पोलिसांनी कृपेश संघवी, जिगर संघवीला अटक केली आहे. कृपेश आणि जिगर हे दोघेही वेस्ट लिकिंग रोडवर वांद्र्यात येत आहेत, आशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी साध्या वेशात त्यांच्यावर नजर ठेऊन त्यांना अटक केली.
14 जणांचा गुदमरुन मृत्यू
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत प्रीती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली दोषी, पारुल, खुशबू मेहता-बन्सल, मनीषा शहा, प्राची खेतान, यशा ठक्कर, सरबजीत परीदा, धैर्य ललानी, विश्व ललानी या १४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत.