औरंगाबादेत शांतिगिरी महाराज लढवणार लोकसभेची निवडणूक, खैरेंचा मार्ग कठीण
औरंगाबाद लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मागील अनेक वर्ष औरंगाबादच्या राजकारणावर वर्चस्व कायम ठेवणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पुढची लोकसभेची निवडणूक कठीण जाऊ शकते असे दिसू लागले आहे. येत्या निवडणुकीत खैरेंच्यासमोर शांतिगिरी महाराजांचे आव्हान असणार आहे. भक्तांच्या इच्छेसाठी आपण पुढची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे शांतिगिरी महाराजांनी सांगितले आहे.
वेरुळच्या जनार्दन स्वामी मठाचे प्रमुख शांतिगिरी महाराजांचा मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खांदेशात लाखो अनुयायी आहेत. त्यामुळे पुढची निवडणूक खैरे यांच्यासाठी कठीण जाणार आहे असे चित्र दिसून येत आहे.
शिवसेना आणि भाजप ही दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. भाजपाकडे शांतिगिरी महाराज हे एक उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडून संधी मिळू शकते. नाहीतर ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील असे दिसत आहे.
शांतिगिरी महाराजांनी 2009 साली लोकसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण अपक्ष लढूनही त्यांना 1 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती.