औरंगाबादेत जमावबंदी, दुसर्‍या दिवशीही उमटताय अफवांचे पडसाद

0

भिमाकोरेगाव येथील घटनेनंतर राज्यभरात अफवा पसरत गेल्या. या अफवांचे पडसाद दुसर्‍या दिवशीही उमटत आहेत. औरंगाबाद, जालना, माजलगाव, बुलडाणा, परभणी, सोलापूर, हिंगोली या शहरातही तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर, उस्मानपुरा, टाऊन हॉल, क्रांती चौक, सिडको, हडको यांसारख्या भागात जमावाने मंगळवारी (२ जानेवारी) तणाव निर्माण केला. हडको येथील सिद्धार्थ नगरात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे वृत्त समोर आले आहे. गोदावरी शाळा, सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर येथे आज सकाळी जमावकडून दोन वाहने जाळून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केल्याने एक-दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. टीव्ही सेंटर व संपुर्ण परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मयूरनगर व परिसरातही मोठा जमाव रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला. शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा करुन शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आज (मंगळवार, २ जाने.) सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास जमावाने आमखास मैदान परिसरात एका एसटी बस फोडल्याची घटना घडली. त्यानंतर मध्यवर्ती बसथनकात वाहतूक थांबविण्यात आली. शहरातील विविध भागात जमाव रस्त्यावर येत असून, पोलिसांनी परिस्थितीच्या पार्श्‍वभुमीवर प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.