औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांसोबत बैठक 

0

आठवडा उलटून गेला मात्र औरंगाबाद शहरातील कचराकोंडी अद्याप सुटलेली नाहीये. दिवसेंदिवस गंभीर होत चालेल्या या विषयाबाबत गुरुवारी (२२ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रश्नात लक्ष घातले. तातडीने आयोजित केलेल्या या बैठकीत औरंगाबाद मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी  शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर मनपाचे पदाधिकारी, अधिकार्यांसोबत चर्चा केली. शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) म्हणजे आज पालकमंत्री डॉ. दीपक सावंत शहरात आले आहेत. नारेगाव येथील कचरा डेपोची पाहणी करून पालकमंत्री आंदोलकांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मागील एक आठवड्यापासून मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या प्रश्नात तोडगा काढण्याचा बराच प्रयत्न केला मात्र नारेगावचे नागरिक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने महापालिकेचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे कचरा प्रश्नात शासनाने लक्ष घालावे अशी विनंती केली होती. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या परिस्थितीची माहिती दिली. गुरुवारी दुपारी १२.४५ ला मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करून महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा केली.

मुंबईहून परतल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा तपशील पत्रकारांना दिला. त्यांनी सांगितले, कि मुख्यमंत्री मागील ३ ते ४ महिन्यांत मनपाने कचऱ्याच्या प्रश्नावर काय-काय काम केले याची माहिती जाणून घेतली. ओला-सुका कचरा १०० टक्के वेगळा करायला हवा. मुंबई, पुण्यात जशी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभाराली आहे तशीच प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारायला हवी. सध्या मनपाने तयार केलेल्या डीपीआरनुसार सर्व यंत्रणा उभारण्यासाठी किमान ४ महिने लागतील. आंदोलकांकडून ६ महिन्यांचा वेळ वाढवून घ्यावा, असेही या बैठकीत ठरवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून नारेगाव परिसरातील गावे कचऱ्याचा त्रास सहन करत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आर्थिक मदत देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती महापौर घोडेले यांनी दिली.

शहरातील रस्त्यांवर 3 हजार टनपेक्षा जास्त कचरा साचला आहे. औरंगाबादच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे शहरात गंभीर परिस्थिती उद्धभवू शकते हे लक्षात येताच मनपा प्रशासनाने डॉक्टरांच्या रजा रद्द केल्या होत्या. तसेच खासगी रुग्णालयांनाही सतर्कतेचे आदेश दिले होते.15 वर्षांपूर्वी हायकोर्टाने नारेगावचा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र अद्यापही हा डेपो बंद करण्यात आला नाही. महापालिकेला पर्यायी जागा मिळाली नसल्याने नारेगावचे लोक आता रस्त्यावर उतरले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.