एमआयएमच्या दोन नगरसेवकांची रवानगी हर्सूल कारागृहात
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील एमआयएमच्या दोन नगरसेवकांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद आणि शेख जफर शेख अख्तर यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांच्या रिमांड यादीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी त्या दोनही नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महापालिकेच्या 16 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक 60 चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊन हॉल वॉर्ड क्रमांक 20 चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अधिकारी बापू जाधव यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी या दोनही नगरसेवकांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, तसेच खुर्ची फेकून मारली होती. यानंतर दोन्ही नगरसेवकांवर सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर दोघेही फरार होते. त्यांना पोलिसांनी शुक्रवारी (५ जानेवारी) अटक केली. पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.