ऋषी कपूरने दुखावले चाहतीचे मन, रणबीरने मागितली माफी
दिग्गज अभिनेते ऋषी कपूर ट्विटरवरील बेधडक आणि बिनधास्त ट्वीट्ससाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्यक्षातही त्यांचे वर्तन असेच काहीसे असल्याचा अनुभव एका चाहतीला आला. ऋषी कपूरनी ओरडल्यामुळे रडकुंडीला आलेल्या या महिला चाहतीला रणबीर कपूरने शांत केले. ऋषी कपूर कुटुंबासोबत वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले होते. कपूर कुटुंब जेवत होते. तिथे उपस्थित असलेल्या एका महिला चाहतीला कपूर कुटुंबाला भेटण्याचा मोह आवरला नाही. तिने सेल्फी घेण्यासाठी कपूर कुटुंबाला विनंती केली. रणबीर आणि नीतू यांच्यासोबत तिने सेल्फी घेतले. मात्र ऋषी कपूर यांच्याकडे तिचे दुर्लक्ष झाले.
ऋषी कपूरसोबत फोटो काढायचा राहिल्याचे लक्षात येताच, ती पुन्हा टेबलकडे आली आणि तिने ऋषी कपूर यांना सेल्फी घेऊ देण्याची विनंती केली. ही विनंती तर केवळ फॉर्मलटी असून ऋषी कपूर फोटोसाठी होकारच देणार, या विचाराने तिने मोबाईल हातात धरला. पण ऋषी कपूर यांनी चक्क तिला नकार दिला.
ऋषी यांच्या नकारामुळे नाराज झालेल्या तरुणीच्या तोंडून ‘किती उद्धटपणा’ असे शब्द बाहेर पडले. हे ऐकताच ऋषी कपूर यांचा रागाचा पारा चढला. ते चारचौघात त्या तरुणीवर ओरडले. ऋषी कपूर ओरडल्यामुळे चाहतीला रडू आवरले नाही. हे पाहून रणबीरने मध्यस्थी केली. आणि त्या तरुणीला शांत केले आणि तिची माफी मागितली. त्यानंतर ऋषी कपूर यांना गाडीकडे जाण्याची विनंती केली.